जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी आहे. कारण, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट शब्दात केंद्र सरकारने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का?, असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहातील उपस्थितीदरम्यान विचारला. मात्र, यासंदर्भातील प्रश्नावर सरकारने दिलेल्या उत्तराने कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे.
जुन्या पेंशन योजनेबाबत सरकार चा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आता, सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचा किंवा संपाचा मार्ग अवलंबतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.