अहमदनगर – दुकानातील सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग घेवून दुचाकीवर नगरकडे येत असलेल्या सराफ व्यावसायिकास मोपेड वर आलेल्या ३ अनोळखी चोरट्यांनी रस्त्यात अडवून सत्तूरचा धाक दाखवत त्यांच्या कडील दागिने आणि रोकड असलेली बॅग हिसकावून घेत पळवून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ७.२० च्या सुमारास नगर सोलापूर महामार्गावर कोंबडीवाला मळा परिसरात घडली.
याबाबत सराफ व्यावसायिक अंबादास रघुनाथ फुंदे (वय ४२, रा. नारायणडोह, ता. नगर) यांनी शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी भिंगार कम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी फुंदे यांचे नारायणडोह गावात सराफी दुकान आहे. गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ७.२० च्या सुमारास ते दुकानातील सोन्याचे दागिने तसेच दिवसभरात जमा झालेली ६० हजारांची रोख रक्कम असा सुमारे १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज बॅग मध्ये ठेवून ते सदर बॅग घेवून दुचाकीवर नगर सोलापूर रोड ने नगरकडे येत होते.
कोंबडीवाला मळा परिसरात आल्यावर अचानक एक मोपेड गाडी त्यांच्या दुचाकीला आडवी आली. त्या मोपेड वरून ३ अनोळखी इसम खाली उतरले. त्यांनी फिर्यादी फुंदे यांना दमबाजी केली तसेच सत्तूरचा धाक दाखवत त्यांच्या कडील सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली.
त्याच बरोबर त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मोपेड वर भरधाव वेगात नगरच्या दिशेने सदर चोरटे पसार झाले. याबाबत फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ३ चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), १२६ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.