पशुपालकांनी योजनांचा लाभ घेत उत्कर्ष साधावा : संभाजी लांगोरे 133 पशुपालकांना दूध काढणी यंत्र तर 75 लाभार्थ्यांना मुक्त संचार गोठ्यासाठी अनुदान
नगर : पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांसाठी दूध काढणी यंत्र पुरवणे व मुक्त संचार गोठा तयार करणे या दोन योजनांतर्गत दोनशेहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पशुसंवर्धन विभाग व दुग्धशाळा समितीच्या सभेत जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पशुपालकांना दूध काढणी यंत्राचा पुरवठा करणे आणि मुक्तसंचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे या दोन योजनांतर्गत लाभ देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पशुसंवर्धन व दुग्धशाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष संभाजी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पशुधन विकास अधिकारी समिती सदस्य यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थ्यांच्या निवडीच्या चिठ्ठ्या हिमांगी सुनील सूर्यवंशी या विद्यार्थीनीच्या हस्ते काढण्यात आल्या.
दूध काढणी यंत्रासाठी 60 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. मुक्त संचार गोठ्यासाठी 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पशुपालकांनी योजनांचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी केले. या सभेसाठी जिल्ह्यातील 14 तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल ठवाळ, डॉ.चंद्रशेखर सोनावळे, पशुधन पर्यवेक्षक अनिल देशमुख उपस्थित होते.
डॉ.दिघे यांनी सांगितले, निवड झालेल्या लाभार्थींनी योजनेच्या निकषाप्रमाणे दूध काढणी यंत्र खरेदी केल्यानंतर तसेच निकषानुसार मुक्तसंचार गोठा तयार केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँक खाती जमा करण्यात येईल. त्यासाठी लाभार्थ्यांनी योजनेचे निकष पूर्ण करणे आवश्यक राहिल.
दूध काढणी यंत्रासाठी नगर-12, राहुरी-12, श्रीरामपूर-6, राहाता-6, कोपरगाव-6, संगमनेर-15, अकोले-8, पारनेर-11, श्रीगोंदा-11, कर्जत-10, जामखेड-6, पाथर्डी-9, शेवगाव-8, नेवासा-13 अशा एकूण 133 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मुक्तसंचार गोठ्यासाठी नगर-7, राहुरी-6, श्रीरामपूर- 4, राहाता-4, कोपरगाव-3, संगमनेर-8, अकोले-5, पारनेर-4, श्रीगोंदा-6, कर्जत-7, जामखेड-3, पाथर्डी-5, शेवगाव-4, नेवासा-7 अशा एकूण 75 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली