नगर – भिंगार रस्त्यावर भुईकोट किल्ल्याजवळील बेलेश्वर चौकात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२७) रात्री घडली.
भिंगार रस्त्यावर बेलेश्वर चौकाजवळ एका इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याची माहिती मंगळवारी (दि.२७) रात्री १०.१५ च्या सुमारास काही नागरिकांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे त्या इसमास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून मयत इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास पोलिस अंमलदार महेश विधाते हे करीत आहेत. या अनोळखी मयत इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फोन क्र. ०२४१ – २४१६१२१ यावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.