पारनेर-सुपा रस्त्यावर एमआयडीसी चौकात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र विठ्ठल बढे (रा. वडनेर हवेली, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी (11 सप्टेंबर) पहाटे 12.45 वाजता माझा मावस भाऊ योगेश शिवाजी भालेकर (रा. वडनेर हवेली) व त्यांचे मित्र देंडगे (पूर्ण नाव नाही, रा. पारनेर) हे सुप्यावरून पारनेरच्या दिशेने जात असताना बुधवारी पहाटे 12.45 वाजता सुपा एमआयडीसी चौकात आले असता तेथे पारनेर रस्त्याकडून सुप्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने समोरून जोराची धडक झाली. यात योगेश शिवाजी भालेकर गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला तर त्याचे सहकारी देंडगे जखमी झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अपघाताची माहिती कळताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला रूग्णालयात दाखल केले व आपघातग्रस्त वाहने बाजुला केली. उपनिरीक्षक एस. पी. कानगुडे पुढील तपास करत आहे.