नगर-मनमाड महामार्गावर गुहा शिवारातील एका पेट्रोल पंपानजीक कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे (वय 61) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज बुधवारी सकाळी घडली आहे. शिर्डीकडून शनिशिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या एमएच 20 एफ.जी-7027 या कारने राहुरी फॅक्टरीहून लोणीकडे जनावरांच्या बाजारासाठी चाललेल्या रंगनाथ आरंगळे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 17 ए एस 1622 ला नगर-मनमाड महामार्गावर गुहा शिवारात जोराची धडकी दिली.
या धडकेत राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीवरील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे रा. राहुरी फॅक्टरी व कारमधील उडीसा राज्यातील सुस्मित संतोष पुष्टी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारने तीन ते चार पलटी मारल्या.
दरम्यान रुग्णवाहिकेतून रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तसेच जखमींना राहुरीत उपचाराठी नेण्यात आले. अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एक बाजूला रस्ता खोदला असून एकेरी वाहतूक सूरु आहे. नगर-मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट पद्धतीने सुरु आहे. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा सवाल उपस्थित होत असून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.