पारनेर तालुक्यातील सुपा चौकात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. गुरूवार (दि. २१) रोजी रात्री १० वाजता एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.
याबाबत नयन सुभाष कोठुळे (वय २४ रा.सारोळा कासार, ता.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुभाष निवृती कोठुळे (वय ५६ रा. सारोळा कासार ता. नगर) हे काम सुटल्यानंतर घरी जात असताना सुपा बस स्थानकासमोरील चौकात वाळवणेकडे वळत असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन अपघात झाला. यात ते जागीच मयत झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून सुपा पोलिस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपा पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पटेल हे करत आहे.
सुपा येथील मेन चौक हा मृत्यूचा सापळा बनला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित कंपनी जाणिव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. सुपा बस स्थानकासमोरील चौक हा वाहतूकीच्या दृष्टीने रहदारीचा चौक असून याठिकाणी यापुर्वीही अनेक अपघात झाले आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना कायम स्वरूपाचे अपंगत्व आले. दोन्ही बाजूने ठेवण्यात आलेले गतीरोधक नाहीसे झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित कंपनीने गतीरोधकाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.