केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर पूर्णत: बंदी घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकारच्या कष्टामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही, केंद्राला शेतकऱ्याबद्दल आस्था नाही असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.
नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले.
या ‘रास्ता रोको’ आंदोलनासाठी जात असताना शरद पवार यांचं रस्त्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच शरद पवार गटाकडून ८० वर्षाचा तरुण योद्धा मैदानात अशा आशयाचे बॅनरही लावण्यात आले होते. यावेळी आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या सभेला संबोधताना पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.”नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या विषयी केंद्राने निर्णय घेतल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “तुम्ही सगळे कष्ट करता, मात्र ज्यांच्या हातामध्ये देशाचे धोरण ठरवण्याचे अधिकार आहेत. त्यांच्यामध्ये तुमच्या कष्टांना किंमत देण्याची भावना नाही. सत्ताधारी केंद्र सरकारमधील मंत्र्यांना जाणीव नसेल तर शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.” असे पवार म्हणाले.
“नाशिक हे कांद्याचे महत्वाचे केंद्र आहे. निर्यातीत सरकारचा हस्तक्षेप नसावा. सरकारची ही धरसोड वृत्ती योग्य नाही, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उद्या या विषयावर दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचेही शरद पवार म्हणाले.