राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीवरून गंभीर आरोप केला आहे. मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे आणि भारतीय शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची भाषा करणाऱ्या केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लादून आपल्याच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे तब्बल दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा, खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
संसदेच्या बजेट अधिवेशनात अमोल कोल्हे यांना आज शुक्रवारी कांदा निर्यातबंदी धोरणावरून केंद्र सरकारवर धारदार टीका केली. राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना खा.कोल्हेंनी अस्खलित हिंदीतून आक्रमक भाषण केले. त्यात त्यांनी कांदा निर्यातवरील निर्बंध, मतदारसंघातील रेड झोनचा प्रश्न आणि बिबट्यांचे वाढते हल्ले याकडे सरकारचे लक्ष वेधले.