कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात दर घसरल्याने बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सोलापूर बाजारपेठेत शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याची आवक घटली होती. शुक्रवारी जवळपास ५०० ट्रक आवक होती.
मात्र, सोमवारी बाजारपेठेत ४२९ ट्रक कांदा इतकाच कांदा आला होता. त्यामुळे घसरलेला दर पुन्हा ५ हजारांवर पोहोचला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर,पुणे,सांगली जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो.