नाशिक : कांदा काढणीवर आल्यावर मार्केटमध्ये नेल्यावर अपेक्षित भाव शेतकऱ्याला मिळत नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी नुकसान सहन करावे लागत असते. परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला अपेक्षित भाव मिळणे शक्य जाणार आहे. कारण उत्पादक शेतकरीच कांद्याचा भाव ठरविणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतील तर ग्राहकांनाही माफक दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता त्यांच्या कांद्याचा दर स्वतःचं ठरवता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून बाजार समितीला पर्यायी विक्री यंत्रणा उभारली जात आहे. याकरिता राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी देखील सुरू करण्यात आलीय. बाजार समितीमध्ये मिळणारा भरवशाचा बाजार भाव तसेच शेतकऱ्याला कांद्याचा भाव स्वतः ठरवता येत नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र आता कांदा दरावरील व्यापाऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शेतकरी पुढे सरसावलेत.
उत्पादनापासून तर थेट कांदा विक्रीपर्यंतची यंत्रणा स्वतः शेतकरी उभारत आहेत. यामध्ये कांदा उत्पादन करणारे शेतकरी उत्पादन करतील, कांद्याचा भाव ठरवतील, शहरापर्यंत वाहतूक देखील शेतकरीच करतील आणि विक्री केंद्रावर कांदा देखील शेतकरी विकतील; अशी साखळी सध्या उभारली जातेय. येत्या दिवाळीपासून ही नवी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहेत.