नगर : शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची ४७ लाख ३ हजार ५४३ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आला आहे. विजय नामदेव गाडे (रा. नंदनवन कॉलनी, एकविरा चौक, पाईपलाइन रस्ता, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी ic ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए-५ या व्हॉट्सअप ग्रुपमधील अनिका शर्मा या महिलेविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. गाडे यांचे नेवासा फाटा येथे रुग्णालय आहे. ते कुटुंबासह नगर शहरात राहतात. दि. १९ जूनला ते फेसबुकवर शेअर ट्रेडींग कसे करावे व शेअर ट्रेडिंगमध्ये नफा कसा मिळवायचा या विषयाची जाहिरात पाहत होते. या जाहिरातीला प्रतिसाद दिला असता एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंकद्वारे त्यांचा मोबाईल क्रमांक आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए-५ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट झाला. त्या ग्रुपच्या अॅडमिन अनिका शर्मा हिने तिच्या व्हॉट्सअॅपवरून डॉ. गाडे यांच्या व्हॉट्सअपवर संपर्क करून ट्रेडींगची माहिती दिली व अधिक परताव्यासाठी, आम्ही सांगेल त्या पध्दतीने गुंतवणूक करा, असे सांगून तिने डॉ. गाडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अनिका शर्माने सांगितल्याप्रमाणे डॉ. गाडे यांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १९ जून ते ९ जुलै २०२४ पर्यंत ३९ लाख ३ हजार ५४३ रुपयांची रक्कम भरली.
डॉ. गाडे यांनी परताव्यासाठी विचारणा केली असता तिने सांगितले की, ‘आयपीओ’मध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे. तुम्ही अधिक पैशाची गुंतवणूक केली तर १५० ते १६० टक्के अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार डॉ. गाडे यांनी ११ जुलैला बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून ८ लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसव्दारे पाठवली. त्यानंतर डॉ. गाडे यांनी अनिका शर्मा हिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता तुम्ही आणखी ४० लाख रुपयांची रक्कम भरा नाही तर तुमचे अकाऊंट फ्रिज होईल व तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, असे सांगत पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.