अहमदनगर :- महसुल विषयक सेवा सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2024 दरम्यान महसुल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या महसुल सप्ताहामध्ये पात्र लाभार्थ्यांनी महसुली सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना
1 ऑगस्ट रोजी महसुल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा होऊन कुटुंबातील त्यांची भूमिका मजबुत व्हावी यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध होण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना व्हावा, यासाठी आवश्यक असणारी अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रे तातडीने उपलब्ध होण्यासाठी 2 ऑगस्ट, 2024 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच संबंधित तालुक्याचे उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यामार्फत योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी सर्व धर्मातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. योजनेच्या लाभासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जन्मदाखला, रेशनकाड,आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना व्हावा यासाठी 3 ऑगस्ट रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजनेला जिल्हा व तालुकास्तरावर अधिक व्यापक स्वरुपात प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचे दाखले, शासनामार्फत ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत.
सैनिकहो तुमच्यासाठी
राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये अन्य संवेदनशील भागात तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक यांना व त्यांच्या कुटूंबियांना आवश्यक असणारे व महसुल कार्यालयाकडुन निर्गमित करण्यात होणारे विविध दाखले, प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडुन प्राप्त अर्जांवर 5 ऑगस्ट रोजी कार्यवाही करण्यात येणार आहे. संरक्षण दलामध्ये कार्यरत असताना शहिद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांची घर, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
एक हात मदतीचा, दिव्यांगाच्या कल्याणाचा
राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रमांबाबतची माहिती 6 ऑगस्ट रोजी आयोजित विशेष शिबीरातुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व महसुल विभागाशी संबंधित विविध दाखले, प्रमाणपत्रही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विविध योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाच्या अनुषंगाने जिल्हा व तालुकास्तरावर शिबीरे आयोजित करुन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपकरणांचे वाटपही करण्यात येणार आहे.
आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्यासाठी अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचीही अनाथ मुलांना लाभ देण्यासाठी मदत घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या महसुल सप्ताहामध्ये वरील सर्व शासकीय योजनांचा तसेच महसुल विभागांशी निगडीत सेवांचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.