पाकिस्तानी खेळाडूंचं क्षेत्ररक्षण हा थट्टेचा विषय बनला आहे. सगळीकडून टीका होत असली तरी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतही पाकिस्तानी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावलेला नाही. शुक्रवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात गोलंदाज मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने मिड ऑनच्या दिशेने फटका लगावला आणि चोरटी धाव घेण्यासाठी तो धावू लागला. सलमान अली आगा मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत होता. तो चेंडू पकडण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळी पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान सलमान आगाकडे पाहून ‘मार दे, मार दे’ (स्टंपवर मारून बवुमाला धावबाद कर) असा ओरडत होता. सलमानने चेंडू अडवला आणि यष्ट्यांपासून तीन ते चार मीटर दूर उभा असलेल्या गोलंदाज मोहम्मद नवाजच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू मोहम्मद नवाजच्या हातावर आदळला. नवाज हात झाडत तिथून बाजूला झाला.