नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. चार वाहने एकमेकांना मागून धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातातील दोन ट्रक रोड सोडून थेट दुकानात घुसले आहेत. अपघातामुळे महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आता क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सध्या अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.