पंढरपूर : कार्तिक एकादशीच्या विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला असतो. त्यानुसार पुढील महिन्यात येणाऱ्या कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस कि अजित पवार या दोघांपैकी कोणाला निमंत्रण द्यायचे याचा पेच पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीपुढे निर्माण झाला आहे. असा पेच मंदिर समिती आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
आषाढी एकादशीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा केली जाते तर कार्तिकीची महापूजा केली जाते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची प्रथा युती शासनाच्या काळात 1995 पासून सुरू करण्यात आली. पहिली कार्तिकीची महापूजा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाली होती. आतापर्यंत आर. आर. पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकीची महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.
येत्या २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीची विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होईल. ही महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत असते. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे असा पेच निर्माण झाला आहे. दीड वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. गेल्या आषाढीला पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता. तर कार्तिकीची महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता
अजित पवारांनी नुकताच भाजप शिवसेनाला पाठिंबा देत सत्तेत उपमुख्यमंत्री पद घेतले आहे. सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या कार्तिकीच्या महापूजेला कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचे; असा नवा पेच समितीपुढे निर्माण झाला आहे. दरम्यान या संदर्भातील मंदिर समितीने राज्य शासनाकडे कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करावी; यासाठी पत्र व्यवहार केला आहे. शासनाच्या आदेशानंतर महापूजेचे निमंत्रण देण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.
राज्यात दोन उपमुख्यमंत्री ….कार्तिकीच्या महापूजेला फडणवीस की पवार
- Advertisement -