महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे अनेक माजी आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत. एकीकडे इंदापूरचे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे पंढरपुरात भाजपला मोठा धक्का बसलाय.
पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अचानक पक्ष सोडल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला वसंतराव देशमुख यांची देखील उपस्थिती होती. कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.
वसंतराव देशमुख हे पंढरपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. याशिवाय ते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील राहीले आहेत. मागील 40 वर्षांपासून देशमुख भारतीय जनता पार्टीत सक्रिय आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.