माजी आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पांडुरंग बरोरा हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु २०१९ मध्ये बरोरा यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दौलत दरोडा यांना उमेदवारी दिली. दौलत दरोडा यांनी बरोरा यांचा पराभव केला होता. आता दौलत दरोडा हे अजित पवार गटात गेल्यानं पांडुरंग बरोरा यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पांडुरंग बरोरा म्हणाले की, शहापूर तालुक्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचसोबत बरोरा कुटुंबाचे शरद पवारांशी जुने ऋणानुबंध आहे. पवारांसोबत आलेल्या कौटुंबिक नात्यांमुळे सध्याच्या परिस्थितीत शरद पवारांना साथ द्यावी असं आमच्या कुटुंबाला वाटते.