परभणी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सर्वांनाच धक्का देत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली. डख यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉ. रामराज चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सुमित जाधव उपस्थित होते. या उमेदवारी अर्जासाबोत त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिलं आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण मालमत्तेची माहिती दिली.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडे फक्त 10 हजार रुपयांची रोख रक्कम असून त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 लाख रुपयांची एफडी आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार पंजाबराव डख यांच्याकडे बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि स्प्लेंडर असून यांची एकूण किंमत 2,30,000 रुपये आहे. तर सोन्याबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे जवळपास दीड तोळे सोने आहे. तर त्यांच्या पत्नीकडे एकूण दहा तोळे (100 ग्रॅम) सोने असून त्याची किंमत 7,00,000 रुपये आहे. पंजाबराव डख यांच्याकडे एकूण 23 लाख 17 हजारांची संपत्ती आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 80 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता याचा समावेश आहे.