वैद्यनाथ कारखान्यासाठी कोट्यवधींचा निधी संकलित, पंकजा मुंडेंचे समर्थकांना महत्वाचे आवाहन
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून सोडविण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थक पुढे सरसावले आहेत. मुंडे समर्थकांकडून तब्बल पाच ते सहा कोटी रुपये जमा करण्यात आले असून आणखीही मोठी रक्कम जमा करण्यासाठी सोशल मिडियातून आवाहन करण्यात येत आहे. समर्थकांच्या या मदतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी समोर येत आवाहन केले आहे. कारखान्याच्या अडचणी सोडविण्यासाठी माझे प्रयत्न चालू असून कार्यकर्त्यांनी स्वत:कडील पैसे गोळा करू नये असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन कार्यकर्ते पैसे जमा करीत आहेत. हे योग्य नसून कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास हेच माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.