बीड : पंकजा मुंडेंकडे एकूण 46 कोटी 11 लाखांची संपत्ती अससल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये मागच्या पाच वर्षात दहा कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे.. विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्जही 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी या शपथपत्रात दिलीय. तर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आलीय.
पंकजा मुंडे यांनी काल भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी सादर केलेले आपल्या संपत्तीच्या विवरणामध्ये पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे एकूण 46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केले आहे. आपला उमेदवारी अर्ज भरताना पंकजा मुंडे यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे सहा कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची चलसंपत्ती आहे यामध्ये बँकेतील वेगवेगळ्या ठेवी बंद पत्रे विविध कंपन्या व बँकेचे शेअर्स तसेच सोन्याचा यात समावेश आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी आहे. त्यासोबतच दोन लाख तीस हजारांचे इतर दागिने पण आहेत. पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाखांची 200 ग्रॅम सोने आणि एक लाख 38 हजार रुपयांचे दोन किलोची चांदी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे..