बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार दिला जाणार आहे. तशी तयारी महाविकास आघाडीकडून सुरू झाली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार मराठा असल्यास किती प्रमाणात फटका बसले, अशी विचारणा केली असात पंकजा म्हणाल्या की, बीड अत्यंत पुढारलेला जिल्हा आहे. बीड जिल्ह्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिले आहेत. अल्पसंख्यांक समाजाचा खासदाही बीडने दिला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने बीड मध्ये मतदान होते हे स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्याची पालकमंत्री असताना प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तींशी संबंध आला. माझ्याबद्दल कोणाच्याही मनात कटुता नाही. राजकीय जीवनातही कोणाला कटुता वाटेल, असे वर्तन मी केले नाही. माझे धोरण सर्वसमावेशक राहिलेअसून निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ उमेदवार म्हणूनच कायम पाहिले. उमेदवार कोणत्या जातीचा हे पहात नाही. लोकसभेची निवडणूक नवीन नाही. मतदारसंघात केलेली विकासकामे आणि लोकांचा माझ्यावरील विश्वास यामुळेच लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला मिळाली आहे. राज्यातील प्रचाराची जबाबदारी अन्य नेत्यांकडे आहे. ती जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतील. पक्षाने प्रचाराची जबाबदारी दिल्यास त्यादृष्टीनेही नियोजन करण्यात येईल. मी लोकसभा निवडणुकीची उमेदवार असल्याने सध्या मी बीड मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.