आगामी विधासभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा भाजपला मतदान नाही, असा थेट इशारा बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी दिला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ बीडच्या सानपवाडीतील येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. २२) एक बैठक घेतली. या बैठकीला गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात नागरिकांनी चर्चा करून एकमताने ठराव देखील घेतला आहे. आता ग्रामस्थांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर पंकजा मुंडे राजकीय पुनर्वसनाविषयी भाजप काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशा पद्धतीचा निर्णय न झाल्यास भाजपाला राज्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या रोशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी जवळपास ६ हजार मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव भाजप कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
कारण, मुंडे घराण्याच्या हातात असलेला बीड मतदारसंघ हा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या आक्रमक नेत्या असून त्यांची बीड जिल्ह्यात मोठी ताकद आहे.