राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. यानंतर नुकतेच भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतरित कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.
भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.”
https://x.com/Pankajamunde/status/1865680741910073843
विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने मंत्रिमंडळातही त्यांना जास्त जागा वाट्याला येणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या अनेकांनी मंत्रिमंळात संधी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. अशात यापूर्वीही मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा मंत्री होणार का, हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.