राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. काही ठिकाणी तर निकाल लागण्याआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. ४ जूनला लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असताना आता बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी एक पोस्ट करत मतदारांना आणि कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.
यामध्ये त्या म्हणतात, “निकाल जो लागेल तो लागेल. लोकांनी सकारात्मकतेने साथ दिली, निर्भीडता ही निष्क्रीयतेवर भारी ठरते. देवाने मला मोठा संघर्ष दिला आणि त्याला पेलण्याची शक्तीही देवाने दिली.”
“लढाई विचारांची असावी, कोणाचाही कायमस्वरुपी तिरस्कार वाटू नये अशा विचारात जडण घडण झाली पाहिजे. सत्तेच्या पदावर काम करताना या गोष्टीचे पथ्य पाळले पाहिजे. मंत्री म्हणून काम करताना कोणावर अन्याय केला नाही, याचं समाधान वाटतं”, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं.
“द्वेषविरहीत राजकारण करणं सोपं नाही, मुद्यांना धरुन राजकारण करायला हवं. एक मिशन असावं, उद्देश असावं, असं राजकारण करावं हे शिवधनुष्य पेलण्याचं काम मी करते, हे केवळ तुमच्या प्रेमापोटी. तुमचे आशिर्वाद नेहमीच सोबत ठेवा”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.