पंकजा मुंडे यांनी आज (२ जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “भविष्यातील निर्णय संघटना घेत असते. मंत्रिपदाबाबत मी भाष्य करण्याची गरज नाही. संघटनेची शिस्त पाळल्यानंतर संघटना प्रत्येक उमेदवाराला, नेत्याला योग्य संधी देत असते.”
पंकजा मुंडे म्हणाल्या, एक मास लीडर म्हणून करत असताना त्या त्या नेत्याला दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. लोकांच्या भावना आणि संघटनेची शिस्त पाळावी लागते. या दोन गोष्टींमध्ये समतोल साधावा लागतो. मी इतक्या वर्षांपासून राजकारणात आहे. लोकांच्या भावना सांभाळत असताना मी आमच्या संघटनेची शिस्त देखील पाळण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाच वर्षांनी मला संघटनेने संधी दिली आहे. हा संपूर्णपणे संघटनेचा निर्णय आहे. तसेच भविष्यातील निर्णय संघटना घेत असते. मी त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि तशी पद्धत देखील नाही.