माझाही पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, मी तो पराभव हसतमुखाने स्वीकारला, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या निकालाबाबत प्रसारमाध्यमं प्रश्न विचारू लागली आहेत, त्यामुळे आता थोडी धाकधुक वाटायला हवी. गेले काही दिवस मी खूप व्यस्त होते. त्यामुळे निकालाबाबत विचार करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. मुळातच आपल्या संस्कृतीत सांगितलंय की ‘कर्म करा, फळाची चिंता करू नका’. केवळ योग्य पद्धतीने तुमचं कर्म करा. कर्म करताना कुठल्याही अभद्र पद्धतीने वागू नका. मी या गोष्टीची नेहमीच काळजी घेत आले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कर्म करताना ज्या विचारांशी बांधले आहे, ज्यासाठी मी राजकारणात आले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून काम करत आलेय. २२ वर्षांच्या राजकीय जीवनात कोणत्याही व्यक्तीबाबत, वर्गाबाबत किंवा कोणत्याही विचारसरणीविषयी एवढ्या संकटातही माझ्या तोंडून एकही अपमानजनक वक्तव्य गेलेलं नाही. याचा मला अभिमान आहे. या निवडणुकीत मला विजय मिळेल याचा मला विश्वास आहे.
दरम्यान, बजरंग सोनवणे यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी झालेल्या वादावरही पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, देशात सर्वत्र जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीचं काम सोपवण्यात आलं आहे. आत्ता केवळ बीडमध्येच निवडणूक झालेली नाही. मी स्वतः या जिल्ह्याची पालकमंत्री होते, सत्तेत होते तेव्हादेखील मी सत्तेचा गैरवापर केला नाही. आता तर मी सत्तेतही नाही. ते जे काही आरोप करतायत ते सगळं चुकीच्या पद्धतीने चाललंय. मागील निवडणुकीतही आमच्याविरोधात तेच होते, तेव्हादेखील आमच्याकडून सत्तेचा गैरवापर झाला नाही. यावेळच्या निवडणुकीत थोडं वेगळं चित्र होतं. ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे उद्या काहीही होऊ शकतं. मात्र मला वाटतं की, त्यांनी (बजरंग सोनवणे) आदळआपट करण्यापेक्षा ते स्वीकारलं पाहिजे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता, तो मी स्वीकारला. यावेळी मात्र माझा विजय होईल आणि तो देखील मी आनंदाने स्वीकारेन.