आ.मोनिका राजळें विरोधात पंकजा मुंडे गट सक्रिय.. 2024 विधानसभा भाजप साठी परीक्षा ठरणार!!
अहमदनगर: वंजारी समाजाचे प्राबल्य असलेल्या पाथर्डी-शेवगाव मतदातसंघातुन पंकजा मुंडे यांनी 2024ची विधानसभा लढवावी यासाठी मतदारसंघातील मुंडे समर्थक उघडपणे पुढे आल्याने विद्यमान आ.मोनिका राजळे यांच्या पुढे एक मोठे आव्हान उभे राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुंडे परिवाराचे आणि पाथर्डीचे एक वेगळे भावनिक नाते आहे. भगवानबाबा गड आणि दसरा मेळावा हे समीकरण कित्तेकवर्षं गोपीनाथ मुंडेंनी जपले. आजही घराघरात गोपीनाथ मुंडे यांचे फोटो देव्हाऱ्यात त्यांचे हजारो चाहते ठेवतात. स्व.मुंडेंच्या नंतर हेच प्रेम पंकजा मुंडे यांना मिळताना दिसत आले.
आ.राजळे आणि मुंडे समर्थक यांच्यात नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप जिल्हा कार्यकारीणीतील मुंडे समर्थक जुन्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला आ.राजळेंकडून आलेली स्थगिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. याचेच पडसाद अगोदर जिल्हा अध्यक्षांना भेटून सामूहिक राजीनाम्याचा इशारा आणि त्यानंतर थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर नाराजी व्यक्त करत झालेली घोषणाबाजी यातून शेवंगाव-पाथर्डी मधील पक्षांतर्गत दुफळी समोर आली आहे.
आता यात थेटपणे माजी पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड आणि माजी जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हापरिषद सदस्य जेष्ठ नेते बाळासाहेब सोनवणे यांनी उघडपणे पदाधिकारी निवडीच्या स्थगितीवर आ.राजळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाथर्डी-शेवगाव मतदातसंघात पंकजाताई देतील तोच उमेदवार अशी भूमिका घेत आता ताईंनींच येथून उमेदवारी करावी अशी मागणी लावून धरली आहे.
लवकरच मुंडे समर्थक आणि जुन्या निष्ठावंत भाजप स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळाने पंकजा मुंडे यांना भेटून उमेदवारीची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. तसेच नजीक आलेल्या नवरात्र उत्सवात पंकजा यांना मोहटादेवी दर्शनासाठी आणत मोठी तयारी करून शक्तीप्रदर्शनातून ताकत दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
शिवशक्ती यात्रेत पंकजा मुंडेंनी मोहटादेवी भेट टाळल्याने चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी नवरात्रात आपण मोहटागडावर दर्शनाला येऊ अशा बातम्यापण आल्या. त्यामुळे एकंदरीत पाथर्डी मतदातसंघांतील भाजप अंतर्गत असलेली चलबिचल सध्या चर्चेत असून भाजप समोर आणि त्याच बरोबर आ.मोनिका राजळेंसमोर नाराजी दूर करण्याचे एक आव्हान असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यासर्व विषयावर स्वतः पंकजा मुंडे यांच्या कडून अद्याप कसलेही वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे निश्चितच राजकीय वर्तुळात उत्सुकता असणार आहे.
पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढून केलेला दौरा माध्यमात चर्चेत आला. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे जीएसटी न भरल्याचे कारण देत त्यांच्यावर जीएसटी विभागाने कारवाईची नोटीस बजावली. एकंदरीत पंकजा मुंडे सत्ताधारी भाजप पक्षात असताना त्यांना डावलले जात असल्याच्या आणि 2019 परळीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपले अस्तित्व नगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवंगाव मतदार संघातुन सिद्ध करत राज्याच्या मुख्य राजकीय प्रवाहात येऊन नेतृत्व करावे यासाठी नगर जिल्ह्यातील त्यांना मानणारा वर्ग सक्रिय झाला आहे.