परभणी जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड या दोन्ही वादग्रस्त अधिकाऱ्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर, शिक्षणाधिकारी पदाचा पदभार असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन वैयक्तिक मान्यता दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते. तर चौकशीअंती भुसारे आणि गरुड हे दोन्ही अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
परभणीचे तत्कालीन प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांनी आपल्या पदाचा पदभार असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून वैयक्तिक मान्यता दिल्याची तक्रार गंगाखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, महालिंग भिसे यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली होती. दरम्यान या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण आयुक्तांनी अनियमितेची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांना दिल्या होत्या. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यावर अखेर चौकशीअंती भुसारे आणि गरुड हे दोन्ही अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.