माजी मंत्री पंकजा मुंडे या परळीतून नाही, तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचा दावा भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याची कुणकुण विद्यमान रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना लागल्यामुळे त्यांचा कडाडून विरोध सुरू झाल्याचेही मुरकुटे यांनी म्हटले आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुरकुटे यांनी जाहीरपणे या गोष्टी सांगितल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. (Marathwada) रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्यातील बहीण-भावाचे नाते आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध पाहता हे शक्य असल्याचे बोलले जाते. दरम्यान, आमदार रत्नाकर गुटे यांनी मात्र `बाहेरून कोणीही आले तरी आम्ही त्यास पुरून उरू`, असे म्हणत दंड थोपटले असल्याचे सांगितले जाते.