राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आज महायुतीच्यावतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. ‘महादेव जानकर कोणत्याही पक्षाकडून, कोणत्याही चिन्हावर, लढले असते तरी त्यांच्यासाठी मी प्रचाराला आले असते. एकवेळ भाऊ बहिणीला विसरेल, पण बहीण भावाला कधीही विसरणार नाही, असा मिश्किल टोला पंकजा मुंडे यांनी त्यांना लगावला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “महादेव जानकर यांनी बारामतीची निवडणूक लढली होती. तेव्हा ते जेथे जागा मिळेल तेथे झोपायचे. सामान्य माणसांबरोबर राहून जेवण करायचे. पण या माणसाने इतिहास रचला. त्यानंतर ते विधानपरिषदेवर गेले आणि मंत्री होऊन अतिशय चांगले काम केले. सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी घर सोडले. आता ते परभणीमधून लढत आहेत. पण ते बाहेरून आल्याचा आरोप त्यांच्यावर होत असला तरी तसा विचार करण्याचे काही कारण नाही. सर्वसामान्य माणसांसाठी, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारा माणूस भटकत-भटकत काम करत असतो. त्यांचा बारामतीमधून सुरू झालेला प्रवास भटकत-भटकत परभणीत येऊन थांबला आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.