पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारी भारताची कुस्तीपटू अंतिम पांघालवर Paris Olympic व्यवस्थापनानं कारवाई केली आहे.
नेमकं घडलं काय?
अंतिम पांघालवर ऑलिम्पिक व्यवस्थापनानं घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नियमभंगामध्ये अंतिम पांघालच्या बहिणीला पॅरिस पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर तिला पोलिसांनी सोडलं. मात्र, त्यानंतर अंतिम पांघालला पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आणि तिच्या सपोर्ट स्टाफसह तिची पुन्हा भारतात रवानगी करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये सर्व स्पर्धा खेळवल्या जात असून तिथेच खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी खेळाडू, त्यांचा सपोर्ट स्टाफ व इतर व्यक्तींसाठी काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येते. ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमधून स्वत:चं काही सामान आणण्यासाठी अंतिम पांघालनं तिची बहीण निशाला पाठवलं होतं. पण ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या पासेसशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. निशाकडे अंतिम पांघालचा पास पाहून पोलिसांना संशय आला व त्यांनी निशाला ताब्यात घेतलं.