संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली असतानाच गुरुवारी नवीन संसदेत घुसखोरीची गटना घडली. लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी सभागृहात उड्या मारल्या.
इतकंच नाही, तर त्यांनी स्मोक कँडल देखील फोडल्या. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ५ आरोपींना अटक केल्यानंतर सहाव्या आरोपीने देखील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ५ तरुण आणि एका तरुणीचा सहभाग आहे. दरम्यान, पोलिसांकडून सध्या आरोपींची चौकशी सुरू असून तपासात चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.
संसदेत घुसखोरी करून आरोपींना १९२९ मध्ये ब्रिटीश राजवटीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करायची होती. क्रांतिकारक भगतसिंग यांनी ‘सेंट्रल असेंब्ली’मध्ये बॉम्ब फेकला होता. असाच प्लान आरोपींचा देखील होता.
त्यासाठी त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप देखील तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहत होते. पोलिसांनी एका आरोपीकडून एक पत्रक देखील जप्त केलं आहे.ज्यामध्ये ‘पंतप्रधान बेपत्ता आहेत आणि जो कोणी त्यांना शोधून काढेल त्याला स्विस बँकेतून पैसे मिळतील’ असा मजकूर लिहण्यात आलेला होता. पोलिस सूत्रांनी सांगितले की, संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींच्या चपला खास डिझाईन करण्यात आल्या होत्या.
त्यात धूर ‘कॅन’ लपवण्यासाठी जागा तयार करण्यात आली होती. आरोपींनी संसदेत पॅम्प्लेट फेकण्याची योजना आखली होती. त्यात त्यांनी तिरंगा झेंडेही खरेदी केल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून आणखी काही पॅम्प्लेट्स जप्त करण्यात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘देशासाठी जे उकळत नाही ते रक्त नाही, पाणी आहे’, अशा प्रकारचे तरुणांना भडकावणारे संदेश त्यात असल्याची माहिती आहे.