नव्या संसदेत काल, बुधवारी देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे २ तरूण थेट लोकसभेत घुसले होते. या तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सदस्यांच्या बाकावर उड्या मारल्या. त्यानंतर त्यांनी स्मोक कँडल देखील फोडल्या होत्या. या घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्यामुळे लोकसभा सचिवालयातील ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रामपाल, अरविंद, विरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कालच्या घटनेनंतर आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरू केला. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खासदारांना संसदीय पास जारी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. आरोपींकडे भाजप खासदाराने दिलेले पास सापडले होते. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
सुरक्षेतील त्रुटीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची बैठक झाली आणि या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. 13 डिसेंबर रोजी झालेल्या सुरक्षेनंतर गुरुवारी संसदेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.