नगर जिल्ह्यातील बहुचर्चित पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात आमदार निलेश लंके यांनी पदाचा राजीनामा देऊन खासदारकी लढवली आणि ते लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आता त्यांच्या जागी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी राणी लंके उभ्या राहणार असल्याचे संकेत खुद्द खासदार निलेश लंके यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राणी लंके सध्या पारनेर नगर मतदारसंघात विविध कार्यक्रमांसह मतदारांच्या भेटी घेत आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे आता खासदार निलेश लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदारकीला हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सोडावा, अन्यथा शिवसैनिक अन्याय सहन करणारे नसतात, वेळप्रसंगी बंडखोरी होईल, असा थेट इशाराही संदेश कार्ले यांनी दिलाय.
खा.लंके यांनी मन मोठं करावे, पारनेरची जागा सोडावी अन्यथा बंडखोरी, ठाकरे गटाचा स्पष्ट इशारा
- Advertisement -