नगर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी चाचपणी सुरू केली असून दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार असेल असे जाहीर केले होते. त्यानंतर आता या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दर्शवली आहे. निष्ठावान शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कार्ले यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ठसा उमटविणारे काम केले आहे. नगर तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. संदेश कार्ले यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकून पारनेर – नगर मतदारसंघातून लढायचे का असा सवाल केला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येतय.
पारनेर मतदारसंघात नगर तालुक्यातील मोठा भाग आहे. नगर तालुक्यात महाविकास आघाडीची पूर्वीपासून ताकद आहे. त्यामुळे संदेश कार्ले यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी चाचपणी केली होती. परंतु, पक्षाने तत्कालिन आमदार विजय औटी यांनाच उमेदवारी दिली होती. आता पारनेर-नगर मतदारसंघात निलेश लंके हे खासदार झाले आहेत. त्यामुळे मविआमध्ये ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे.