राष्ट्रवादीतील फुटीअगोदर खासदार सुजय विखे यांच्याविरोधात नगरमध्ये लोकसभेसाठीचे संभाव्य उमेदवार म्हणून आमदार निलेश लंके यांच्याकडे पाहिले जात होते. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार लंके अजितदादांच्या गटात सामील झाल्याने त्यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्याचे बोलले जाते.
यातच आमदार लंके यांच्याकडून विखे पिता-पुत्रांवर धडाडणारी टीकेची तोफही थंडावल्याने दिसून आले. पण आता लंके यांनी नाव न घेता विखेंवर निशाणा साधल्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
दुसऱ्याच्या झेंड्यावर आजकाल काहीजण महिलांना पंढरपूर-शिर्डी असे देवदर्शन घडवून आणत आहेत. मात्र, यातून त्यांच्या पदरात काही पुण्य पडणार नसून मतदारही आकर्षित होणार नाहीत”, असे म्हणत आमदार निलेश लंके यांनी नाव न घेता खासदार सुजय विखे पाटील यांना टोला लगावला.
आपण आठ वर्षापूर्वी कोणतीही स्वार्थी भावना मनात न ठेवता सर्वसामान्य जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी महिला-पुरुषांना देवदर्शनाचा उपक्रम सुरू केला. आता काहीजण 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना पंढरपूर-शिर्डी देवदर्शन घडवत आहेत. निवडणुकीनंतर ते तुम्हाला ‘रामराम’ही करणार नाहीत, पण आम्ही सदैव तुमच्या सेवेला हजर असू, असेही आमदार लंके यांनी म्हटले आहे.