गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खूप चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून निलेश लंके आणि भाजपाकडून डॉ. सुजय विखे यांच्यामध्ये लढत झाली होती व यामध्ये निलेश लंके विजयी होऊन सुजय विखे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती.परंतु आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी की काय डॉ. सुजय विखे हे पारनेर मधून शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या राणी लंके यांच्या विरोधात मात्र सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी डॉ. सुजय विखे यांनी लोणी येथे सर्वपक्षीय विखे समर्थक नेते तसेच पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
पारनेर मधून अजून देखील उमेदवारी बाबत एकमत होत नसल्यामुळे अखेर कोणाला उमेदवारी द्यावी यासाठी त्यांनी थेट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया राबवली.असाच काहीसा प्रयोग 2004 मध्ये विधानसभेच्या वेळी तत्कालीन आमदार वसंतराव झावरे यांना शह देण्यासाठी तेव्हाचे खासदार बाळासाहेब विखे यांनी केला होता व तेव्हा झावरे यांच्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता व त्याचीच पुनरावृत्ती आता सुजय विखे यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे.पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके उमेदवार असून त्यांच्या विरोधामध्ये आता अजितदादा गटाकडून कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवण्याकरिता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी लोणी येथे सर्वपक्षीय विखे समर्थक नेते तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असावा यासाठी थेट कार्यकर्त्यांचे मतदान घेतले.
पारनेरची जागा अजितदादा गटाला निश्चित झाली असल्यामुळे या ठिकाणहून जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे तसेच पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.तसेच भाजपचे विश्वनाथ कोरडे हे देखील या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पारनेरमधून जास्त प्रमाणात इच्छुकांची संख्या असल्यामुळे आता अजित दादांनी एकमेकांमध्ये एकमत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
19 ऑक्टोबरला पारनेरमध्ये अजित पवार गटाकडून जो काही मेळावा झाला त्यामध्ये या सगळ्या इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन देखील केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यातून मार्ग काढण्यासाठी लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याकरिता की काय डॉ. सुजय विखे पारनेरच्या मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी थेट पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची खडकी वाकी येथे बैठक घेतली व उमेदवारीबाबत एकमत होत नसल्यामुळे थेट कार्यकर्त्यांचे मतदान घेण्याचा निर्णय घेतला. याकरिता काशिनाथ दाते तसेच सुजित झावरे व विजय औटी व विश्वनाथ कोरडे या इच्छुकांची मतपत्रिका तयार करण्यात आली व मतदान घेतले गेले.यामध्ये दीडशे कार्यकर्त्यांनी मतदान केले व मतदान झाल्यानंतर मतपेटी सिलबंद केली आहे. आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये ही मतमोजणी पार पडेल व कार्यकर्त्यांची पसंती कोणाला यावर त्यानंतर शिक्कामोर्तब होईल व उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे पारनेर मधून पुन्हा लंके विरुद्ध विखे संघर्ष पाहायला मिळणार हे मात्र निश्चित.