विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीने 288 पैकी 230 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. तर लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत 41 जागा मिळवल्या. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानंतर डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांना शुभेच्छा देताना त्यांच्या खाद्यांवर हात ठेवून फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. अरोराची अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत कशी झाली? असा सवालच मिटकरींनी केला. तर नरेश आरोरा यांच्यावर टीका केल्यानं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडून अमोल मिटकरी यांना समज देण्यात आली आहे. ‘अमोल मिटकरी हे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार असून त्यांनी डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबद्दल बोलून पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. हे दुर्देवी आहे. माझा पक्ष आणि माझे वडील अजित पवार हे अमोल मिटकरींच्या मतांशी सहमत नाहीत. त्यांना विनंती आहे की, या प्रकरणात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत तसेच मीडियाला बाईट देऊ नयेत’, असे आवाहन करत पार्थ पवार यांनी मिटकरींना खडसावलं आहे.