दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या तब्बल १४ औषध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने ही कारवाई केली आहे.
उत्तराखंड सरकारने सोमवारी (ता. २९) संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. त्यात असं म्हटलंय की, “पतंजली आयुर्वेदाच्या उत्पादनांबाबत वारंवार दिशाभूल करणारी जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे आम्ही कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे.”
बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.या १४ औषधांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले आहेत. इतकंच नाही, तर या औषधांचा परवाना देखील सरकारने रद्द केला आहे. तसा आदेशही सर्व जिल्हा औषध निरीक्षकांना पाठवण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.