योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची पतजंली आयुर्वेद कंपनी पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण, पतंजलीच्या दिव्य दंतमंजन या दात घासण्याच्या पावडरवरमध्ये चक्क मासाहारी घटक असल्याचा दावा करण्यात आलाय. वकील यतीन शर्मा यांनी यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेनंतर हायकोर्टाने बाबा रामदेव यांना नोटीस धाडली आहे.
यावर तातडीने उत्तर द्यावे, असे आदेशही हायकोर्टाने बाबा रामदेव यांना दिले आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. मागील काही महिन्यांपासून बाबा रामदेव आणि त्यांची पतंजली कंपनी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कोरोना व्हायरसच्या लसविषयी केलेल्या दाव्यानंतर सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना चांगलंच फटकारलं होतं.
इतकंच नाही, तर त्यांना जाहीर माफी देखील मागावी लागली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पतंजली कंपनीने आपल्या दिव्य दंत मंजनमध्ये ‘समुद्र फेन’ (कटलफिश) नावाचा मांसाहारी पदार्थ वापरला, असा आरोप वकील यतीन शर्मा यांनी केलाय.मांसाहारी घटकांचा वापर करूनही त्यांनी उत्पादनाला हिरव म्हणजेच शाकाहारी लेबल लावलं आहे. त्यामुळे चुकीची माहिती दिल्याने आपल्या भावना दुखावल्या म्हणत वकील यतीन शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची हायकोर्टाने दखल घेतली असून पतंजली आयुर्वेद, पतंजली दिव्य फार्मा आणि बाबा रामदेव यांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वी 2023 मध्ये दिल्लीतील एका लीगल फर्मने अशाच प्रकारची नोटीस योगगुरु बाबा रामदेव यांना धाडली होती. तेव्हा पतंजलीचं उत्पादन असलेल्या दिव्य दंतमंजनमध्ये च्या हाडांची भुक्टी असल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला होता. या नोटीसीवर पतंजलीने कायदेशीर उत्तर दिलं होतं.