Monday, July 22, 2024

पाटेगाव-खंडाळा ‘एमआयडीसी’ला जुलै अखेर मान्यता ,आ. रोहित पवार यांचे उपोषण मागे

पाटेगाव-खंडाळा ‘एमआयडीसी’ला जुलै अखेर मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

आ. रोहित पवार यांचे उपोषण मागे

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
-जामखेड, ता. १० – कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाचं हत्यार उपसताच सरकारही एक पाऊल मागे आले आहे. जुलैअखेर ‘एमआयडीसी’ला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना दिल्याने एमआयडीसी साठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु केलेले उपोषण आमदार रोहित पवार यांनी मागे घेतले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयाचा आमदार रोहित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. एमआयडीसीला तत्वतः मान्यता आणण्यापासून तर जागा पाहणी, ड्रोन सर्व्हे, व्यवहार्यता अहवाल, तांत्रिक समितीची मान्यता हे सर्व टप्पे त्यांनी पूर्ण केले आहेत. सध्या ही फाईल एमआयडीसीची अंतिम अधिसूचना काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या फाईलवरील धूळही झटकली जात नाही आणि केवळ माजी मंत्री आणि विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय दबावामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

त्यामुळे ही एमआयडीसी मंजूर करण्यासाठी त्यांनी गेल्या चार ते पाच अधिवेशनात वेगवेगळ्या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला. गेल्यावर्षी तर विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भर पावसात त्यांनी आंदोलन केले आहे. त्यावेळी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना दिले होते. त्यानंतरही सातत्याने त्यांनी या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवला असता त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली, परंतु त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही त्यांनी पत्र देऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची आणि एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. परंतु तरीही याबाबत काहीही कार्यवाही झालेली न झाल्याने या सरकारचे हे अधिवेशन अखेरचे असून किमान आतातरी अधिसूचना काढा अन्यथा पुन्हा विविधमंडळाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा देणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष या तिघांनाही दिले होते. तसेच औचित्याच्या मद्द्याद्वारेही हा विषय विधिमंडळात उपस्थित केला, मात्र यावर काहीही तोडगा न काढल्याने आज (गुरुवार) आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण केले. त्यावर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना बोलावून घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह चर्चा केली आणि कर्जत-जामखेडमधील #MIDC ची प्रलंबित फाईल जुलै २०२४ अखेरपर्यंत मंजूर करण्याचा शबाद दिला. तसंच माझा शब्द हा अंतिम असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केल्याने आमदार रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे लवकरच मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागेल आणि मतदारसंघातील युवांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

‘‘जुलै अखेर ‘एमआयडीसी’ची अधिसूचना काढण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला आहे. ते आपल्या पदाची गरीमा राखतील, असा विश्वास आहे. तसंच विधिमंडळात महामहिम उपराष्ट्रपती जगदीप धनखड येणार असल्याने त्यांचा सन्मान राखणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि मा. विधानसभा अध्यक्ष यांनी #MIDC च्या प्रश्नी योग्य मार्ग काढल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. यावेळी आदरणीय पवार साहेब आणि माझ्या संपर्काच्या मदतीने या एमआयडीसीमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणल्या जातील आणि या माध्यमातून युवांना रोजगार मिळेल.’’

रोहित पवार
(आमदार कर्जत जामखेड)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles