आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोण तयार आहे, कोण नाही, यापेक्षा पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला खासदार बनवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे, आपल्याला दोन नंबरचं काम करायचं नाही, तर एक नंबरच काम करायचं आहे, असे म्हणत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना टोला लगावला.
पाथर्डी येथील पोलीस वसाहत येथे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य ग़हनिर्माण व कल्याण मंडळ अंतर्गत 23 कोटी 81 लक्ष रक्कमेच्या पोलीस वसाहत व पोलीस स्टेशन इमारतीच्या कामाचे उद्घाटन प्रसंगी विखे बोलत होते.
यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, सहा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, लोकप्रतिनिधींमुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवनामध्ये काय बदल झाला हे महत्त्वाचे आहे. फक्त फोटो आणि आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस गेले आहेत. राजकारणामध्ये संधी फार महत्त्वाची असते ती मिळाल्यानंतर तिचा जनतेसाठी कसा उपयोग करून देता येईल यावर लोकप्रतिनिधींचे भविष्य अवलंबून असते. दक्षीण उत्तरेचा कुठलाही वाद नाही.