नगर अर्बन बँकेला वन टाईम सेटलमेंट योजना राबविण्यास केंद्रीय निबंधक कार्यालयाची परवानगी
जास्तीत जास्त कर्जदारांनी योजनेचा लाभ घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, राजेंद्र चोपडा यांचे आवाहन
नगर: नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप बॅंकेच्या थकबाकीदार, कर्जदारांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय सहकार निबंधक विभागाने परवानगी दिली आहे. जागृत सभासद राजेंद्र चोपडा तसेच बॅंक बचाव समितीने यासाठी पाठपुरावा केला होता. आता कर्ज थकबाकी असलेल्यांना या योजनेमुळे संभाव्य कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे. तसेच थकबाकी जमा झाल्याने बॅंकेलाही ठेवीदारांच्या ठेवी परत देणे सुलभ होईल. जास्तीत जास्त कर्जदारांनी या योजनेतून कर्ज परतफेड करावी असे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी केले आहे.
राजेंद्र चोपडा यांनी सांगितले की, नगर अर्बन मल्टीस्टेट बॅंकेची कोट्यवधींची थकबाकी, तत्कालीन काही संचालक व काही अधिकाऱ्यांनी केलेला गैरकारभार यामुळे रिझर्व्ह बँकेने बॅंकेचा बॅंकिंग परवाना रद्द केला. सध्या बॅंकेवर अवसायक नियुक्त आहेत. कर्ज वसुलीला वेग मिळावा यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालयाकडे वन टाईम सेटलमेंट योजनेची मागणी केली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कर्जदारांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कर्ज थकबाकी जमा करावी. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर कारवाई टळू शकते. तसेच सर्वसामान्य ठेवीदारांनाही त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे.