पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल असं आश्वासन नेत्यांना देण्यात आलं आहे. यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यामुळे मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी अनेक इच्छूक आमदार आतुर झाले आहेत, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, “मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासूनच तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली. ते म्हणाले, “काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली असली तरीही अजून कोणताही निरोप आलेला नाही. पण लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्हाला असं वाटतंय की येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे”, असं भरत गोगावले म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार… शिंदे गटातील आमदार म्हणाले फोन येऊ द्या, मग आम्ही…
- Advertisement -