पुणे आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बालेकिल्ल्यातूनच अजित पवार यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दोन वेळा तयारी करूनही अजित पवार यांनी लोकसभेची उमेदवारी न दिल्याने आता यंदा तरी संधी हुकायला नको म्हणून अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे सोमवारी थेट ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
संजोग वाघेरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री वरील सदिच्छा भेट होती. तसेच मी मावळ लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. गेली दोन टर्म मी लोकसभेची तयारी करतो आहे. पण मला लोकसभेची संधी दिली गेली नाही. यंदा मला लोकसभेसाठी संधी मिळावी अशी अपेक्षा आपण उद्धव ठाकरे यांचेकडे व्यक्त केली.मी अद्याप प्रवेश केला नाही. त्यावर ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला असून त्यांचा निर्णय आल्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.