नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप मोठ्या मतांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनातील समारोपाच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये परदेश दौऱ्यासाठी आमंत्रणे आली आहेत. त्यामुळे विदेशी लोकांनाही माहीत आहे की, ‘आयेगा तो मोदी ही…!’
राज्यसभेत विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनावधानाने केलेल्या टिप्पणीचा पुन्हा एकदा उल्लेख करताना भाजपला ३७० तर ‘एनडीए’ ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. विरोधी पक्षाचे नेतेही ‘चारसो पार’चा नारा देत आहेत. २०१९ मध्ये ‘एनडीए’ने ३५० हून अधिक जागा जिंकल्या होत्या, आता यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकू शकू. हा भाजपचा आतापर्यंतचा सर्वांत निर्णायक विजय असेल, असे मोदी म्हणाले. भाजपला लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री असली तरी, कार्यकर्त्यांनी पुढील १०० दिवस तनमनाने बुथस्तरावर काम केले पाहिजे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक लाभार्थी-प्रत्येक समाजापर्यंत पोहोचा, त्यांचा विश्वास मिळवा, अशी सूचना सभागृहात उपस्थित असलेल्या सहा हजारहून अधिक पदाधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी केली