Saturday, October 12, 2024

नगर शहरातील महिलेची एक कोटी 70 लाखांची फसवणूक ; सीए विजय मर्दासह जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर-केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. ते कर्ज परत न भरता त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सविता भानुदास कोतकर (वय 48 रा. लक्ष्मी निवास, शाहुनगर, केडगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी काल, मंगळवारी (1 ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक संदीप वालचंद सुराणा (वय 42 रा. चास ता. नगर), सीए विजय मर्दा (वय 62), गणेश दत्तात्रय रासकर (वय 46, दोघे रा. धाडीवाल कॉम्प्लेक्स, एस.टी.स्टॅण्ड समोर, नगर), अशोक सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेचा शाखाधिकारी अभय निघोजकर (वय 54), व्यावसायिक सागर कटारीया (वय 43 रा. भुषणनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मयुर शेटीया व इतरांनी फिर्यादी सविता कोतकर यांच्या नावावर 21 फेब्रुवारी 2015 रोजी अशोक सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेतून एक कोटी 70 लाख रूपयांचे कर्ज काढले होते. यातील एक कोटी 50 लाख रुपयांची रक्कम फिर्यादीच्या करंन्ट/चालू खात्यावर जमा झाली होती. कोणतेही देणे नसतानाही त्यातील 11 लाख 15 हजार रुपये मयुर शेटीया याच्या संम्यक ट्रेडर्स नावाने दिले गेले. तसेच कोणतेही देणे नसताना संदीप सुराणा याने एक कोटी 31 लाख 20 हजार रुपये काढून घेतले. याबाबत फिर्यादी यांनी संशयित आरोपींना विचारणा केली असता त्यांनी पती भानुदास महादेव कोतकर व त्यांचे भाऊबंद राहुल उर्फ दिलीप बबनराव कोतकर यांचा हवाला दिला. दरम्यान, यानंतर भानुदास कोतकर यांना एप्रिल 2018 मध्ये एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

ते तुरूंगात असताना सीए मर्दाच्या सांगण्यावरून डिसेंबर 2018 मध्ये गणेश रासकर याने इन्कमटॅक्स भरण्याच्या नावाखाली चालू खात्याचे चेक बुक घेण्यासाठी कोर्‍या कागदावर फिर्यादीच्या सह्या घेतल्या. चेक बुक आल्यावर पाच कोर्‍या चेकवर सह्या घेऊन त्याचा गैरवापर केला. दरम्यान, या प्रकरणात बँकेचा मार्केटयार्ड शाखाधिकारी निघोजकर याने इतर संशयित आरोपींना मदत केली. ज्यामुळे फिर्यादीचे कर्ज खाते एन.पी.ए.मध्ये असताना कर्ज खात्यात जाणून बुजून रक्कमा जमा न करता त्या चालू खात्यात जमा केल्या आहेत. सदरच्या रक्कमा जमा करण्यासाठी निघोजकर याने फिर्यादीच्या चालू खात्याचा नंबर संशयित आरोपींना दिला.

दरम्यान, फिर्यादी यांना जेव्हा कर्ज मंजूर झाले तेव्हा ती रक्कम त्यांच्या चालू खात्यावर जमा झाली होती. ती रक्कम संशयित आरोपींनी संगणमताने काढून घेतली होती. त्या बाबतीत आयकर विभागाकडे तक्रार होण्याची भीती वाटल्याने त्यांनी फिर्यादीला रक्कम दिल्याचे दाखविले व ती रक्कम जाणून बुजून फिर्यादीच्या कर्ज खात्यावर जमा न करता चालू खात्यावर जमा करून ती त्वरीत काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles