नगर – शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या सावेडी उपनगरातील दोन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी छापेमारी केली. कॅफे चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून तेथे अश्लिल चाळे करताना पकडलेल्या मुला-मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
मनमाड रस्त्यावरील डौले हॉस्पिटलजवळ मेलडी कॅफेत तसेच पंपिंग स्टेशन रोडवर ताठे नगर येथील स्टार कॅफेत शाळा- कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तोफखान्याचे पो.नि. आनंद कोकरे यांनी पोलिस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदारांच्या २ टीम तयार करून छापे टाकले.
या ठिकाणी कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार करून मुला- मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. दोन्ही ठिकाणी अनेक मुले – मुली आढळून आल्या. त्यांना समज देवून सोडून देण्यात आले.
डौले हॉस्पिटलजवळ मेलडी कॅफेचा मालक शिरीष शरद संसारे (रा. भगवानबाबा चौक, निर्मलनगर) याच्या विरुद्ध पो.कॉ. बाळासाहेब भापसे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला तर पंपिंग स्टेशन रोडवर, ताठे नगर येथील स्टार कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे (रा. ताठेनगर, सावेडी) याच्या विरुद्ध पो. कॉ. दत्तात्रय कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.