Saturday, October 12, 2024

सहा कोटींचे अपहार प्रकरण , नगरमधील ‘या’ मल्टिस्टेट’च्या पाच शाखांवर पोलिसांचे छापे

अहमदनगर -सुमारे सहा कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह पाच शाखेत पोलिसांनी छापेमारी करून कागदपत्रे जप्त केली आहेत. या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. फॉरेन्सिक ऑडीटसाठी आवश्यक कागदपत्रे, फाईल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून 112 ठेवीदारांचे पाच कोटी 78 लाख 65 हजार 90 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडे मळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करत असून या गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी मुंबई येथील कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे कंपनीकडे देण्यात आली असून ऑडीट पूर्ण झाल्यानंतर कंपनी पोलिसांना अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, गुन्ह्याच्या अनुषंगाने पतसंस्थेच्या शाखेतील कागदपत्रांची आवश्यकता असल्याने पोलिसांनी या पतसंस्थेची बालिकाश्रम रस्त्यावरील मुख्य शाखा, पाईपलाईन रस्ता (सावेडी), भिंगार, मिरजगाव (जामखेड), घोगरगाव (श्रीगोंदा) या शाखेत छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, फाईल ताब्यात घेतल्या आहेत. त्या तपासणीसाठी फॉरेन्सिक ऑडीट करणार्‍या कंपनीकडे दिल्या जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles